कार्यक्रम

राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनी

१. प्रस्तावना

NCERT, नवी दिल्ली यांच्या दिशानिर्देशांप्रमाणे सन १९७१ पासून शालेयस्तरापासून राष्ट्रीय पातळीपर्यंत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्रात सन १९७४-७५ पासून तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.


२. मुख्य विषय व उपविषय

राष्ट्रीय निकड व सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन NCERT, नवी दिल्ली यांच्याकडून दरवर्षी विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय व उपविषय निश्चित करण्यात येतात.


३. उद्दिष्टे

विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता (Creativity) वाढीस लागून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होते; तसेच मार्गदर्शक शिक्षकांच्या सहकार्याने तयार केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृती सादर करण्यासाठी अधिकृत व्यासपीठ उपलब्ध होते.

सर्व मान्यताप्राप्त शाळेतील विद्यार्थी खालील दोन गटांतून सहभाग घेतात :

  • प्राथमिक गट (इयत्ता ८ वी पर्यंत)
  • माध्यमिक गट (इयत्ता ९ वी ते १२ वी)

त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर हे आपल्या शैक्षणिक साधनांच्या सादरीकरणासाठी सहभागी होतात.


४. निवड प्रक्रिया

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातून (प्राथमिक गट व माध्यमिक गट) गुणानुक्रमे निवड झालेल्या २० वैज्ञानिक प्रतिकृतींची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनातील सहभागासाठी शिफारस करण्यात येते.

साधारणतः NCERT, नवी दिल्ली यांच्यामार्फत यामधून ६ ते १० वैज्ञानिक प्रतिकृतींची राष्ट्रीय प्रदर्शनातील सहभागासाठी निवड केली जाते.


५. सुधारित पारितोषिक रचना

शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२०२४/प्र क्र १४६/एस डी -१ दिनांक २४ मार्च २०२६ नुसार राज्यस्तरीय प्रदर्शनातील बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्यात आली, ती खालीलप्रमाणे आहे.

राज्यस्तरीय प्रदर्शनातील पारितोषिक रचना (शा.नि. संकीर्ण-२०२४/प्र क्र १४६/एस डी -१/दि. २४ मार्च २०२६)

पारितोषिक क्रमांक प्राथमिक विद्यार्थी गट माध्यमिक विद्यार्थी गट शिक्षक गट
सर्व साधारण आदिवासी दिव्यांग सर्व साधारण आदिवासी दिव्यांग प्राथमिक माध्यमिक प्रयोगशाळा सह. / परी.
प्रथम ₹५१,००० ₹५१,००० ₹५१,००० ₹५१,००० ₹५१,००० ₹५१,००० ₹५१,००० ₹५१,००० ₹५१,०००
द्वितीय ₹३१,००० ₹३१,००० ₹३१,००० ₹३१,००० ₹३१,००० ₹३१,००० ₹३१,००० ₹३१,००० ₹३१,०००
तृतीय ₹२१,००० ₹२१,००० ₹२१,००० ₹२१,००० ₹२१,००० ₹२१,००० ₹२१,००० ₹२१,००० ₹२१,०००
चतुर्थ ₹११,००० ₹११,००० ₹११,००० ₹११,००० ₹११,००० ₹११,००० ₹११,००० ₹११,००० ₹११,०००
उत्तेजनार्थ -१ ₹१०,००० ₹१०,००० ₹१०,००० ₹१०,००० ₹१०,००० ₹१०,००० ₹१०,००० ₹१०,००० ₹१०,०००
उत्तेजनार्थ -२ ₹१०,००० ₹१०,००० ₹१०,००० ₹१०,००० ₹१०,००० ₹१०,००० ₹१०,००० ₹१०,००० ₹१०,०००
उत्तेजनार्थ -३ ₹१०,००० ₹१०,००० ₹१०,००० ₹१०,००० ₹१०,००० ₹१०,००० ₹१०,००० ₹१०,००० ₹१०,०००

४.२ मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रम

शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२०२४/प्र क्र १४६ (ई-११८०५१६)/एस डी-१ दिनांक ०६ मे २०२६ नुसार राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० मध्ये विज्ञान शिक्षणाला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचारसरणी आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना अनुभवाधारित व प्रयोगशील शिक्षणाच्या माध्यमातून विज्ञान अधिक समजण्यास सोपे करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल लॅब, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणकीय विचार यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, संशोधनवृत्ती आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम बनविण्याचा उद्देश आहे.

याकरिता मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे व या उपक्रमांतर्गत खालीलप्रमाणे भेटीचे आयोजन करण्यात येते.


भेटीचे आयोजन
  1. राज्यातील तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात प्रथम येणाऱ्या प्रत्येकी ६ असे एकूण २१४८ विद्यार्थी (३५८ × ६ = २१४८) व त्यांच्या सोबतच्या २० पर्यवेक्षक / विज्ञान शिक्षक यांना रामन सायन्स सेंटर, नागपूर / पिंपरी-चिंचवड सायन्स सेंटर, पुणे किंवा नेहरू तारांगण, मुंबई यापैकी जे विज्ञान केंद्र नजीक असेल त्या ठिकाणी भेट देण्याचे आयोजन करण्यात येते.
  2. राज्यातील जिल्हा स्तरावरील प्राथमिक व माध्यमिक (सर्वसाधारण गट), प्राथमिक व माध्यमिक (दिव्यांग गट) आणि प्राथमिक व माध्यमिक (आदिवासी गट) मधून निवड झालेल्या एकूण १८० विद्यार्थी व ०८ पर्यवेक्षक / शिक्षक यांना बंगळूरू येथील इसरो (ISRO) केंद्राला भेट देण्याचे आयोजन करण्यात येते.
  3. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या उत्कृष्ट ५१ विद्यार्थी, ०१ शिक्षक, ०१ शिक्षिका व ०२ प्रशासकीय अधिकारी / समन्वयक अशा एकूण ५५ व्यक्तींना अमेरिका येथील नासा (NASA) केंद्राला भेटीचे आयोजन करण्यात येते.
  4. राज्यातील तालुकास्तर व जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्या-त्या जिल्हास्तरावरील जिल्हा योजनेत (DPDC) तरतूद करून निधी खर्च करण्यात येतो.

मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारीचे स्वरूप

  1. एन. सी. ई. आर. टी., नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्याचप्रमाणे राज्यशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांनुसार तालुकास्तर, जिल्हास्तर आणि राज्यस्तरावरील बाल वैज्ञानिक प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते.
  2. तालुकास्तरावर बाल वैज्ञानिकांना त्या-त्या विभागातील नजिकच्या सायन्स सेंटरला भेट देण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद/ शिक्षण निरीक्षक यांच्या स्तरावर समिती गठित करण्यात यावी.

    विज्ञान प्रदर्शनाच्या मूल्यमापनासाठी खालील दोन गट निश्चित करावेत :
    • उच्च प्राथमिक स्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंत)
    • माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर (इयत्ता ९ वी ते १२ वी)
    यामधून तालुकास्तरावरील प्राथमिक व माध्यमिक स्तरातील सर्वसाधारण, दिव्यांग व आदिवासी गटातून प्रत्येकी प्रथम क्रमांकावरील एक याप्रमाणे ०६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी.

    त्यामुळे तालुकास्तरावरील पात्र विद्यार्थ्यांची संख्या २१४८ (३५८ × ०६) इतकी असून २० पर्यवेक्षक / विज्ञान शिक्षक अशा एकूण २१६८ व्यक्तींना प्रतिव्यक्ती कमाल रु.२०,०००/- इतका खर्च त्या-त्या जिल्हास्तरावरील जिल्हा योजनेत (DPDC) तरतूद करण्यात येते.
  3. मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारीतील तालुका स्तरावर विद्यार्थ्यांची निवड करणे, भेटीचे स्थळ निश्चित करणे, भेटीचे नियोजन करणे याची जबाबदारी तालुकास्तरावरील नियंत्रक म्हणून गट शिक्षणाधिकारी यांची राहील.
    • विद्यार्थ्यांची निवड करणे.
    • भेटीचे स्थळ निश्चित करणे.
    • भेटीचे नियोजन करणे.
    • गठित करण्यात आलेल्या समितीमार्फत भेटीच्या सर्व खर्चाचा हिशोब संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्याकडे सादर करणे.

जिल्हास्तरीय निवड प्रक्रिया

राज्यातील एकूण ३४ जिल्हे व मुंबई (उत्तर / पश्चिम / दक्षिण) मधील ०३ याप्रमाणे एकूण ३७ ठिकाणी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन राबविण्यात येते. यापैकी १६ आदिवासी जिल्हे आहेत.

जिल्हास्तरीय प्रदर्शनात तालुकास्तरीय प्रदर्शनातून निवड झालेले विद्यार्थी सहभागी होतात. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनांमधून विद्यार्थ्यांच्या दोन गटातून राज्यस्तर प्रदर्शनासाठी निवड करण्यात येते.

जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिकांची निवड करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येते. सदर गटातून मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारीतील विद्यार्थ्यांना बंगळूरू येथील इसरो (ISRO) केंद्राला भेट देण्यासाठी खालीलप्रमाणे निवड करण्यात येते :

अ. क्र. गट राज्यस्तर प्रदर्शनासाठी जिल्हास्तरावर निवड करावयाच्या विद्यार्थी संख्या
१ प्राथमिक विद्यार्थी गट (सर्वसाधारण) १ × ३७ = ३७
२ प्राथमिक विद्यार्थी गट (दिव्यांग) १ × ३७ = ३७
३ प्राथमिक विद्यार्थी गट (आदिवासी) १ × १६ = १६
४ माध्यमिक विद्यार्थी गट (सर्वसाधारण) १ × ३७ = ३७
५ माध्यमिक विद्यार्थी गट (दिव्यांग) १ × ३७ = ३७
६ माध्यमिक विद्यार्थी गट (आदिवासी) १ × १६ = १६
एकूण १८०

उपरोक्तनुसार, राज्यातील जिल्हा स्तरावरील प्राथमिक व माध्यमिक (सर्वसाधारण गट), प्राथमिक व माध्यमिक (दिव्यांग गट) आणि प्राथमिक व माध्यमिक (आदिवासी गट) मधून निवड झालेल्या १८० विद्यार्थ्यांसोबतच्या ०८ पर्यवेक्षक विज्ञान शिक्षक यांना बंगळूरू येथील इसरो (ISRO) केंद्राला भेट देण्यासाठी व्यवस्था करण्यात येते.

याकरिता प्रतिव्यक्ती कमाल रु. ३५,०००/- इतका खर्च त्या-त्या जिल्हास्तरावरील जिल्हा योजनेत (DPDC) तरतूद करण्यात येते.

राज्यस्तरीय निवड व नासा (NASA) भेट

५. जिल्हास्तरीय जबाबदाऱ्या

जिल्हास्तरावरील विद्यार्थ्यांची निवड करणे व भेटीचे नियोजन करणे याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / शिक्षण निरीक्षक यांची राहते. त्यानुसार, गठित करण्यात आलेल्या समितीमार्फत भेटीच्या सर्व खर्चाचा हिशोब संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्याकडे करण्यात येतो.


६. नासा (NASA) भेटीसाठी निवड समिती

उच्च प्राथमिक स्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंतचे विद्यार्थी) आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर (इयत्ता ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी) गटाकरिता राज्यस्तरीय उत्कृष्ट ५१ बाल वैज्ञानिक विद्यार्थ्यांची व ०४ प्रशासकीय अधिकारी / विज्ञान शिक्षक यांची अमेरिका येथील नासा (NASA) भेटीच्या वारीकरिता निवड संचालक,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र , पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येते. सदर समिती अमेरिका येथील नासा (NASA) भेटीचे नियोजन करते.


७. नासा (NASA) भेटीसाठी निवड निकष
गट राष्ट्रीयस्तर प्रदर्शनासाठी राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या राष्ट्रीयस्तर प्रदर्शनासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यां व्यतिरिक्त गुणानुक्रमे निवड करावयाची विद्यार्थी संख्या मुख्यमंत्री विज्ञान वारी करिता निवड करावयाची एकूण विद्यार्थी संख्या
प्राथमिक विद्यार्थी गट (सर्वसाधारण) ७ १० १७
प्राथमिक विद्यार्थी गट (दिव्यांग) २ २ ४
प्राथमिक विद्यार्थी गट (आदिवासी) २ २ ४
माध्यमिक विद्यार्थी गट (सर्वसाधारण) ७ ११ १८
माध्यमिक विद्यार्थी गट (दिव्यांग) २ २ ४
माध्यमिक विद्यार्थी गट (आदिवासी) २ २ ४
एकूण २२ २९ ५१

८. नासा (NASA) भेट

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड झालेल्या ५१ विद्यार्थी व सोबत जाणाऱ्या ०४ प्रशासकीय अधिकारी / विज्ञान शिक्षकांकरिता ८ दिवसांच्या कालावधीतील अमेरिका येथील नासा (NASA) भेटीच्या वारीकरिता विमान प्रवास खर्च, व्हिसा खर्च, निवास व्यवस्था तसेच तेथील प्रवास खर्च करण्यात येतो.

४.२ पश्चिम भारत विज्ञान जत्रा

नेहरू विज्ञान केंद्र, वरळी, मुंबई येथे आयोजित पश्चिम भारत विज्ञान जत्रेतील सहभागासाठी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातून गुणानुक्रमे निवड झालेल्या खालील प्रदर्शनीय प्रतिकृती सहभागी होतात :

  • प्राथमिक स्तरातील तीन वैज्ञानिक प्रतिकृती.
  • माध्यमिक स्तरातील तीन वैज्ञानिक प्रतिकृती.
  • माध्यमिक शिक्षक गटातील तीन शैक्षणिक साधने.

याप्रमाणे एकूण नऊ प्रदर्शनीय प्रतिकृती पश्चिम भारत विज्ञान जत्रेमध्ये सहभागी होतात.

४.३ ग्रामीण विज्ञान छंद मंडळे

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी, यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांमध्ये क्षेत्रीय अधिकारी व विज्ञान-गणित शिक्षक संघटनेच्या मदतीने विज्ञान छंद मंडळे स्थापन करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येते. या मंडळांच्या अंतर्गत विज्ञान विषयक विविध उपक्रम राबविले जातात.

४.४ शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम

(अ) माध्यमिक स्तरावरील शिक्षक प्रशिक्षण

शालेय स्तरावर गणित व विज्ञान शिक्षणाची गुणवत्ता वाढावी आणि शिक्षकांचे विषयज्ञान व कौशल्य समृद्ध व्हावे, याकरिता राज्यातील सर्व माध्यमिक शाळांमधील गणित व विज्ञान शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते.


(ब) प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावरील शिक्षक प्रशिक्षण

उच्च प्राथमिक शाळेतील गणित व विज्ञान शिक्षणाची गुणवत्ता वाढावी, हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद आणि खाजगी अनुदानित उच्च प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना गणित आणि विज्ञान विषयाचे सेवांतर्गत प्रशिक्षण देण्यात येते. संस्थेमार्फत या प्रशिक्षणासंबंधीचे आयोजन, व्यवस्थापन, संनियंत्रण व अनुधावन (follow-up) यासंबंधीची संपूर्ण कार्यवाही केली जाते.


४.५ राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव

  1. सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद (NCSM), कोलकाता यांच्यामार्फत दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव आयोजित करण्यात येतो.
  2. विद्यार्थी, शिक्षक आणि जनसामान्यांत वैज्ञानिक साक्षरतेचा प्रसार करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि शालेय विद्यार्थ्यांच्या अभिनय क्षमतांना वाव देणे, या हेतूने विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन केले जाते.
  3. राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद (NCSM), कोलकाता यांच्याद्वारे राष्ट्राची निकड लक्षात घेऊन विज्ञान नाट्योत्सवाकरिता मुख्य विषय व उपविषय निश्चित केले जातात. तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर या उपक्रमांतर्गत विज्ञान नाट्य स्पर्धांचे आयोजन केले जाते.
  4. या विज्ञान नाट्य स्पर्धेत प्रत्येक शाळेतील इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंतच्या कमाल आठ विद्यार्थ्यांची एक चमू विहित विषय / उपविषयावर आधारित ३० मिनिटांचे विज्ञान नाट्य सादर करते.
  5. राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद (NCSM) अंतर्गत नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई हे झोनल स्तरीय (पश्चिम भारत) विज्ञान नाट्य स्पर्धेचे आयोजन करते. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि दीव-दमण या राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वोत्कृष्ट प्रत्येकी एक विज्ञान नाट्य सहभागी होते.
  6. झोनल स्तरावरून सर्वोत्कृष्ट दोन विज्ञान नाट्य राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात सहभागी होते.
  7. राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट ठरलेल्या विज्ञान नाट्यांना प्रमाणपत्रासह पुरस्कृत केले जाते.

४.६ विज्ञान मंच योजना

सद्यस्थिती : ही योजना NCERT स्तरावरून तात्पुरती स्थगित करण्यात आल्यामुळे सध्यस्थितीत बंद आहे.
  1. इयत्ता ८ वी उत्तीर्ण होऊन इयत्ता ९ वी मध्ये नियमित शिकत असलेले विद्यार्थी विज्ञान मंच निवड चाचणीसाठी पात्र ठरतात.
  2. प्रत्येक जिल्हा विज्ञान मंच केंद्रासाठी शहरी भागातील (अ गट) ३० आणि ग्रामीण भागातील (ब गट) ४० याप्रमाणे जिल्ह्यातून एकूण ७० शालेय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.

    दिवाळी किंवा दीर्घ मुदतीच्या सुट्यांमध्ये सात दिवसीय शैक्षणिक शिबिराचे आयोजन करण्यात येते.
  3. राज्यात ३४ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक आणि मुंबई शहरात तीन, याप्रमाणे एकूण ३७ विज्ञान मंच केंद्रे कार्यरत आहेत.

    विज्ञान मंच शिबिरात वैज्ञानिक व्याख्याने, प्रयोग, कृती, प्रश्नमंजुषा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वैज्ञानिक सहली इत्यादींचे आयोजन करण्यात येते.

४.७ राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTSE) — राज्यस्तरीय मार्गदर्शन शिबीर

सद्यस्थिती : ही योजना NCERT स्तरावरून तात्पुरती स्थगित करण्यात आल्यामुळे सध्यस्थितीत बंद आहे.
  1. NCERT, नवी दिल्ली यांच्यामार्फत सन १९६३ पासून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTSE) शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित केली जात आहे.
  2. शालेयस्तरावरील इयत्ता १० वी अखेर प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य द्यावे आणि पुढे या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांनी राष्ट्राच्या विकासासाठी योगदान द्यावे, या हेतूने ही शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित आहे.
  3. या योजनेअंतर्गत NCERT, नवी दिल्ली दरवर्षी १,००० शिष्यवृत्त्या प्रदान करते. यापैकी १५० शिष्यवृत्त्या अनुसूचित जातीसाठी आणि ७५ शिष्यवृत्त्या अनुसूचित जमातीसाठी राखीव असतात.
  4. महाराष्ट्र राज्यातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त NTSE शिष्यवृत्त्या प्राप्त व्हाव्यात, या हेतूने राज्यस्तरीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येते. विशेषतः ग्रामीण भागातील प्रज्ञावंत, गरजू आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत यश प्राप्त व्हावे, यासाठी १२० विद्यार्थ्यांचे दहा दिवसीय राज्यस्तरीय मार्गदर्शन शिबीर दरवर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस आयोजित करण्यात येते.
  5. राज्यस्तरीय मार्गदर्शन शिबीर निवासी स्वरूपाचे असून, यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी आकारली जात नाही.
  6. या शिबिरात राज्य पातळीवरील २० तज्ज्ञ प्राध्यापक (NTSE Stage 2) अंतिम परीक्षेतील यशासाठी आवश्यक मार्गदर्शन करतात.

४.८ अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा

  1. राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद (NCSM), कोलकाता अंतर्गत नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई यांच्या दिशानिर्देशांप्रमाणे तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.
  2. विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त करणे, त्यांच्यामध्ये कार्यकारणभाव रुजविणे आणि त्यांना वैज्ञानिक विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी अधिकृत व्यासपीठ उपलब्ध करून देणे, या हेतूने हा उपक्रम आयोजित केला जातो. शासनमान्य शाळेतील इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात.
  3. दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, कोलकाता यांच्याकडून अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याकरिता विषय निश्चित केला जातो.
  4. सहभागी विद्यार्थी विषयावर आधारित पूरक शैक्षणिक साहित्याच्या आधारे सहा मिनिटांचे अभ्यासपूर्ण भाषण देतात.
  5. राज्यस्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यातून विहित मूल्यांकन निकषांप्रमाणे एका विद्यार्थ्याची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड केली जाते.
  6. राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यातून गुणानुक्रमे दहा विजेत्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून पुरस्काराच्या स्वरूपात शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.

४.९ INSPIRE MANAK योजना

  1. Innovation in Science Pursuit for Inspired Research (INSPIRE) हा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे.
  2. शालेयस्तरापासूनच प्रतिभावान विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाच्या अभ्यासाकडे आकर्षित करणे आणि त्यांना विज्ञानाच्या मूलभूत शाखेतील उच्च शिक्षणासाठी तसेच संशोधन कार्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.
  3. हा कार्यक्रम अकराव्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाला असून बाराव्या पंचवार्षिक योजनेत (सन २०१२–२०१७) पुढे सुरू ठेवण्यात आला.
  4. INSPIRE कार्यक्रमांतर्गत INSPIRE Award ही योजना इयत्ता ६ वी ते १२ वी मधील शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यान्वित आहे.
  5. महाराष्ट्र राज्याकरिता राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर ही State Nodal Agency म्हणून कार्य करते. जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / शिक्षण निरीक्षक हे या योजनेकरिता जिल्हा समन्वयक अधिकारी आहेत.
  6. या योजनेत इयत्ता ६ वी ते १२ वी वर्ग असलेल्या सर्व व्यवस्थापनांच्या मान्यताप्राप्त शाळांनी सहभाग घेणे अपेक्षित आहे. शाळांनी inspireaward-dst.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून संबंधित शाळांना विद्यार्थ्यांची नामांकने विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांना ऑनलाईन सादर करावी लागतात. प्राप्त प्रस्तावांनुसार DST, भारत सरकार विद्यार्थ्यांची INSPIRE Award साठी निवड करते.
  7. अवॉर्डप्राप्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांचे प्रथम जिल्हास्तरावर (DLEPC) सादरीकरण केले जाते. जिल्हास्तरावरून राज्यस्तरासाठी निकषानुसार उत्कृष्ट प्रकल्पांची निवड होते आणि राज्यस्तरीय प्रदर्शनात (SLEPC) सहभागी प्रकल्पांमधून निकषानुसार उत्कृष्ट प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेसाठी (NLEPC) निवड केली जाते.
  8. SAKURA Student Exchange Programme of Japan या कार्यक्रमांतर्गत, राष्ट्रीय प्रदर्शनात पुरस्कारप्राप्त INSPIRE Award विद्यार्थ्यांना DST कडून जपान देशाचा प्रवास करण्याची संधी दिली जाते.

४.१० राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद

मुख्य विषय (२०२६-२७ करिता)

“शाश्वततेसाठी विज्ञान आणि नवोपक्रम”

(Science and Innovation for Sustainability)

1. प्रस्तावना

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी 10 ते 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजित करण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा, निरीक्षणक्षमता, तर्कशुद्ध विचार, संशोधनवृत्ती आणि नवोपक्रमशीलता विकसित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद ही मॉडेल मेकिंग स्पर्धा नसून संशोधनाधारित वैज्ञानिक उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या सभोवतालच्या परिस्थितीतील एखादी समस्या ओळखून तिचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करावयाचा आहे. त्यासाठी Observation (निरीक्षण), Survey (सर्वेक्षण) आणि Experiment (प्रयोग) या पद्धतींचा सुयोग्य वापर करून लघु संशोधन प्रकल्प तयार करावयाचा आहे.

प्रकल्पामध्ये मॉडेल असणे अनिवार्य नाही. विद्यार्थ्यांनी समस्या ओळखणे, माहिती संकलित करणे, प्रयोग करणे, माहितीचे विश्लेषण करणे आणि वैज्ञानिक निष्कर्ष मांडणे याला प्राधान्य आहे.


2. मुख्य विषय व उपविषय (सदर विषय दरवर्षी बदलत असतो)

मुख्य विषय

शाश्वततेसाठी विज्ञान आणि नवोपक्रम

(Science and Innovation for Sustainability)

उपविषय
  1. कचरा व्यवस्थापनासाठी R5
    Reduce, Reuse, Retrieve, Redesign & Recycle
  2. ऊर्जेसाठी E4
    Explore, Experiment, Enhance & Evolve
  3. पाणी
    Harvesting, Harnessing, Recycling & Conservation
  4. अन्न, शेती आणि आरोग्य
    Food, Agriculture & Health
  5. शाश्वततेसाठी भारतीय ज्ञान प्रणालीचा उपयोग
    Application of Indian Knowledge Systems for Sustainability

3. प्रकल्पाची रचना

प्रत्येक प्रकल्पासाठी दोन विद्यार्थ्यांचा गट असावा. त्यापैकी एक गटप्रमुख आणि दुसरा सहकारी असेल.

विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील वास्तविक समस्या निवडून तिचा वैज्ञानिक अभ्यास करावा. प्रकल्पाची प्रक्रिया साधारणपणे—

समस्या ओळख → संशोधन प्रश्न → उद्दिष्टे → निरीक्षण/सर्वेक्षण → प्रयोग → माहिती संकलन → विश्लेषण → निष्कर्ष → उपाय/नवोपक्रम → प्रकल्प अहवाल

एका शाळेतून कितीही प्रकल्प सादर करता येतात. त्यामुळे शाळांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे अपेक्षित आहे.


4. वयोगट

विद्यार्थ्यांचे वय 31 डिसेंबर 2026 रोजी विचारात घेतले जाईल.

वयोगट वय साधारण इयत्ता
लहान वयोगट 10 ते 14 वर्षे 5 वी ते 8 वी
मोठा वयोगट 14+ ते 17 वर्षे 9 वी ते 11 वी

5. निवड प्रक्रिया

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी प्रकल्पांची निवड विविध स्तरांवर केली जाते—

तालुका → जिल्हा → विभागीय → राज्य → राष्ट्रीय स्तर

विद्यार्थ्यांना प्रत्येक स्तरावर आपला संशोधन प्रकल्प सादर करण्याची संधी मिळते.


6. प्रकल्प सादरीकरण

प्रत्येक प्रकल्पाचे सहा मिनिटांत सादरीकरण करावयाचे आहे.

सादरीकरणासाठी—

  • चार चार्ट किंवा
  • चार PPT स्लाइड्स

यांचा वापर करता येईल.

सादरीकरणामध्ये प्रकल्पाचे नाव, समस्या, उद्दिष्टे, कार्यपद्धती, निरीक्षण/सर्वेक्षण/प्रयोग, माहितीचे विश्लेषण, निष्कर्ष आणि उपाय/नवोपक्रम यांची संक्षिप्त मांडणी करणे अपेक्षित आहे.


7. नोंदणी व कालावधी

ऑनलाइन नोंदणी 01 जुलै ते 15 ऑगस्ट
नोंदणी संकेतस्थळ https://n-csc.in/
प्रकल्प सादरीकरण ऑक्टोबर/नोव्हेंबर

प्रकल्पाची ऑनलाइन नोंदणी करताना प्रकल्पाचे नाव व उपविषय अत्यंत महत्त्वाचा असल्याने नोंदणीपूर्वी त्याबाबत योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.


8. मार्गदर्शन व्यवस्था

नोंदणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रकल्पाची कार्यपद्धती व प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत तज्ञ शिक्षकांचे विनामूल्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येईल.

मार्गदर्शनामध्ये—

  • समस्या व विषय निवड,
  • संशोधन प्रश्न तयार करणे,
  • निरीक्षण व सर्वेक्षण,
  • प्रयोगाची आखणी,
  • माहिती संकलन व विश्लेषण,
  • प्रकल्प अहवाल लेखन आणि
  • सहा मिनिटांचे सादरीकरण

यांचा समावेश असेल.


9. सहभागाचे फायदे

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनवृत्ती विकसित होण्यास मदत होते.

प्रमुख फायदे—

  1. वैज्ञानिक संशोधन पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव.
  2. समस्या ओळख व समस्या निराकरण कौशल्याचा विकास.
  3. राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रकल्प सादर करण्याची संधी.
  4. राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट ठरलेल्या बाल वैज्ञानिकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध विज्ञान परिषदांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकते.
  5. देशातील महत्त्वपूर्ण संशोधन संस्थांमध्ये संशोधनाचा अनुभव मिळण्याची संधी.
  6. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र.
  7. प्रत्येक मार्गदर्शक शिक्षकास प्रमाणपत्र.
  8. विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम व वैज्ञानिक विचारांना चालना.

मागील 30 वर्षांमध्ये महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत सहभाग घेतला असून महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे.


10. अपेक्षित निष्पत्ती

या उपक्रमाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये—

  • वैज्ञानिक दृष्टिकोन,
  • संशोधनवृत्ती,
  • निरीक्षण व विश्लेषण कौशल्य,
  • तर्कशुद्ध विचार,
  • प्रयोगशीलता,
  • समस्या निराकरण क्षमता,
  • नवोपक्रमशीलता आणि
  • शाश्वत विकासाबाबतची जाणीव

विकसित होण्यास मदत होईल.

तसेच स्थानिक समस्यांवर विद्यार्थ्यांकडून वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून व्यवहार्य व शाश्वत उपाय सुचविले जाऊ शकतात.

सूचना : या वर्षी २०२६-२७ या सत्राकरिता सदर उपक्रम राबविण्याची जबाबदारी जिज्ञासा ट्रस्ट, ठाणे या संस्थेला केंद्र शासनाकडून दिली आहे.